⚡बांदा ता.०९-: पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे दिला जाणारा “ग्रामरत्न सरपंच पुरस्कार २०२६” शेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रांजल प्रशांत जाधव यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाबळेश्वर (पाचगणी) येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष श्री. हुकूमचंद आमदारे, शिव व्याख्याते व शाहू-फुले-आंबेडकर विचारवंत संभाजी मोहिते, महाराष्ट्र सरपंच परिषद संघटनेचे अध्यक्ष श्री. जयंत दादा पाटील, ए. आय. मार्गदर्शक श्री. अमेय पांगरकर, दीपक हिंगे पाटील, विलास गाडगे, उद्योजक श्री. प्रदीप जाधव, महिला बालकल्याण विभाग जि. प. सातारा सभापती सौ. ऋतुजा शिंदे, डॉ. रामजी अडकेकर (पुणे) तसेच श्री. अमेय जोशी (पुणे CSR फंड व लोकसहभाग) आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. प्रांजल जाधव म्हणाल्या, “हा सन्मान माझा एकटीचा नसून संपूर्ण शेर्ले गावाचा आणि ग्रामस्थांचा आहे. ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा सन्मान मिळाला आहे.”
यावेळी त्यांनी मार्गदर्शक म्हणून खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, माजी सरपंच उदय धुरी तसेच तालुका प्रमुख बबन राणे यांचे विशेष आभार मानले.
