आम. निलेश राणे :कुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक,पाणी टंचाई आराखड्यातील सर्व कामे झालीच पाहिजेत..
⚡कुडाळ ता.०९-: पाऊस पडला की पाणी टंचाईचा आराखडा आपोआप रद्द होतो, हे आता चालणार नाही, पाणी टंचाई आराखड्यातील कामे पूर्ण झालीच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका आमदार निलेश राणे यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीत घेतली. प्रसंगी माणुसकी दाखवा, नियम बाजूला ठेवून लोकांच्या पाण्याची सोय करा, असे स्पष्ट निर्देश आमदार निलेश राणे यांनी दिले. कुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक आज पंचायत समिती सभागृहात झाली त्यावेळी आमदार निलेश राणे बोलत होते.
आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज कुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, तहसीलदार सचिन पाटील, बीडीओ महेश भोगटे व्यासपीठावर उपस्थित होते.
लघु पाटबंधारे विभागाचे दीपक गवस यांनी पाणी टंचाई आराखड्याबाबत माहिती दिली. २०२५-२६ साठी ५१ लाखाचा तर २०२६-२७ साठी ५९ लाख रुपयांचा आराखडा पाठवण्यात आला असल्याचे श्री. गवस यांनी सांगितले. त्यावर चर्चा झाली. सभापती मिलिंद नाईक यांनी प्रशासकीय मान्यता मिळून सुद्धा आराखड्यातील कामे पूर्ण होत नाहीत, याकडे लक्ष वेधले. गेल्या वर्षीची कामे का झाली नाही, असे आमदार निलेश राणे यांनी विचारले असता पाऊस पडला की आराखडा रद्द होतो असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. त्यावर यापुढे हे चालणार नाही, पाऊस पडला तरी टंचाई आराखड्यातील कामे झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश आमदार निलेश राणे यांनी दिले. पाणी टंचाई आराखडा जानेवारीत करण्यापेक्षा तो नोव्हेंबर पासून करा अशा सूचना देखील आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिल्या.
सध्या एखाद्या गावात पाणी टंचाई असेल तर त्यावर लगेच काय उपाययोजना करणार, असे जि प सदस्य दीपक नारकर यांनी विचारले. त्यावर श्री. गवस यांनी टँकरने पुरवठा करतो असे सांगितले. त्यावर जिल्हा टँकर मुक्त झाला आहे. टँकर वापरणे योग्य नाही असे जि प सदस्य दिपलक्ष्मी पडते यांनी सांगितले. नारायण राणे यांनी जिल्हा टँकर मुक्त केला होता. पण गेल्या दहा वर्षात टँकर संस्कृती आली कशी ? ती आपल्याला पूर्णपणे नष्ट करायची आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करूया, असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत बघितले तर आराखडे १०-२० लाखाचे बनविले जायचे. पण आता आराखडे किमान २ ते ३ कोटीचे करावेत अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. विंधन विहिरींची खोली १८० मीटरने वाढवून ती ३०० मीटर पेक्षा जास्त करा अशी मागणी दीपक नारकर यांनी केली. त्यावर आमदार निलेश राणे यांनी कायम पाऊस पडला की पाणी टंचाईचा आराखडा आपोआप रद्द होतो, हे आता चालणार नाही, आराखड्यातील कामे पूर्ण झालीच पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका आमदार निलेश राणे यांनी घेतली. प्रसंगी माणुसकी दाखवा, नियम बाजूला ठेवून लोकांच्या पाण्याची सोय करा, असे स्पष्ट निर्देश आमदार निलेश राणे यांनी दिले.
१५ गावांकडून पाणी टंचाई बाबत पत्र आली आहेत. पण तालुक्यात १५० पेक्षा जास्त गावात पाणी टंचाई असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे याकडे आमदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले. जलसुविधा आणि नागरीसुविधाचा निधी खर्च झाला पाहिजे. जलसुविधेचे उद्दिष्ट ५ कोटी तरी नागरीसुविधेसाठी ३ कोटीचे उद्दिष्ट ठेवले आहे ते पूर्ण करा. भूजल पातळी कमी होते, त्यासाठी तज्ज्ञांना बोलवा, अशा स्पष्ट सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. कुडाळ मध्ये राबविलेल्या जलसंधारण प्रकल्पचि राज्याने दखल घेतली पाहिजे असे काम करा असे आवाहन आमदार महोदयांनी केले.
गेली पाच वर्षे पाणी टंचाई आराखडा निरंक दाखवला जातो याबाबत पत्रकारांनी सुद्धा आमदार महोदयांचे लक्ष वेधले. यापुढे हे चालणार नाही असे आमदार निलेश राणे सांगितले. जलजीवनचा अनुशेष भरून काढला जाईल, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली. वर्ग दोनच्या जमिनीबाबत देखील सभागृहात चर्चा झाली. त्यावर विधिमंडळात प्रश्न मांडून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असे आमदार म्हणाले.
हि पहिलीच पाणी टंचाई सभा होती. त्यासाठी थोडी खेळीमेळीच्या वातावरणात झाली. पण प्रत्येकवेळी तसेच होईल हे गृहीत धरू नका. उत्तरे देण्यासाठी उत्तरे देऊ नका. मी पाठलाग करणारा आमदार आहे. काम करा. तुमचा सत्कार जाहीर करू असे आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
यावेळी झालेल्या चर्चेत माजी जि प अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, रुपेश कानडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जि प आणि प स सदस्य, अधिकारी, खातेप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
