नरडवे इंग्लिश स्कूलच्या नूतन वास्तूचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण…

⚡कणकवली ता.०९-: अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित नरडवे इंग्लिश स्कुल च्या नूतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, ९ मे २०२६ रोजी उत्साहात पार पडला. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य नरडवे गावातील पंचक्रोशीतील ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘नरडवे इंग्लिश स्कूल’च्या माध्यमातून गेली ७० वर्षे सुरू आहे. अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित या शाळेने ग्रामीण भागातील अनेक पिढ्यांना शिक्षणाचा दीप दिला आहे.

शाळेची जुनी मातीची इमारत जीर्ण झाल्यानंतर २०१९ मध्ये संस्थेच्या कार्यकारिणीने नव्या इमारतीच्या उभारणीचा संकल्प केला होता. त्यानुसार माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, हितचिंतक व दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने ही सुसज्ज व आकर्षक वास्तू उभारण्यात आली आहे.

या प्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अशा सुविधा अत्यंत आवश्यक असून ही नूतन वास्तू ग्रामीण शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, अध्यक्ष जे. वाय. सावंत, सरचिटणीस विजय सावंत, खजिनदार गणेश रावराणे, माजी जि.प. सदस्य सुरेश ढवळ, सरपंच गणपत सावंत, उपाध्यक्ष सुरेश परब, उपाध्यक्ष सुहास सावंत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page