नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारचा अपघात:आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर जखमी..
⚡कणकवली ता.०९-: मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती व मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई येथून हिर्लोक, कुडाळच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कारमध्ये आई, वडील व मुलगी असे तिघेजण प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना कारमधून बाहेर काढले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार दिल्यानंतर अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला. सुदैवाने कार डिव्हायडरवरील बॉक्समधून कार सर्व्हिस रस्त्यावर कोसळता-कोसळता थांबली, अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
