छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ४२७ दाखल्यांचे आम. केसरकरांच्या हस्ते वितरण…

⚡सावंतवाडी ता.०८-: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन येथील तहसीलदार कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात एकुण ६८९ दाखले तयार करण्यात आले असून तब्बल ४२७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या अभियानाद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ अंतर्गत सावंतवाडी मंडळात राबविण्यात आले. यात एकुण ६८९ विविध प्रकारचे दाखले तयार करण्यात आले. विशेष मोहिमेत शेतकरी दाखल्यांपासून ते संजय गांधी निराधार योजनेपर्यंतच्या विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. एकूण तयार करण्यात आलेल्या ६८९ दाखल्यांपैकी ४२७ दाखल्यांचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले असून २६२ दाखले वितरणासाठी शिल्लक आहेत. श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यातून वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दाखले उपलब्ध करून दिले जात आहेत. महसूल प्रश्न सोडविले जात आहेत. वेंगुर्ले गवळीवाडा, गेळे काबुलायदार ७/१२ उतारा वाटप, कातकरी समाजबांधवांनी हक्काचे जमीन वाटप आदीही होत आहे. या अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले असून त्यांच्या नावाने हे अभियान सुरू आहे. छत्रपतींच्या नावाने आम्ही राज्य करत असताना त्यांचा आदर्शवर राज्यकारभाराचे अनुकरण करत छत्रपतींना अभिप्रेत असा कारभार करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, तहसीलदार श्रीधर पाटील यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, प्रांताधिकारी श्रद्धा पवार, तहसीलदार श्रीधर पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे आदींसह तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page