विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका…

⚡मालवण, ता.०३-: परिमंडळ मालवण अंतर्गत नियतक्षेत्र कांदळगाव येथील मौजे बुधवळे मळेशेत परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या पथकाने रविवारी रात्री यशस्वी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक ग्रामस्थ श्री. राजू मुणगेकर व श्री. संदिप बुधवळेकर यांनी रात्रीच्या सुमारास विहिरीत बिबट पडल्याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जलद बचाव पथक व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची तपासणी केली असता तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले.
सदर बचावकार्य मा. मिलीश दत्त शर्मा (उपवनसंरक्षक, सावंतवाडी) व डॉ. सुनील लाड (सहाय्यक वनसंरक्षक, सावंतवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये वनक्षेत्रपाल कुडाळ श्री. संदीप कुंभार, वनपाल मालवण सदानंद परब, वनरक्षक धामापूर अतुल खोत, वाहन चालक राहुल मयेकर तसेच RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबरर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे आणि स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग होता.
वनविभागाने या मोहिमेत सहकार्य केलेल्या ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. तसेच बिबट हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार बिबट हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे किंवा शिकारीचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा घटना आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, ३ मे हा ‘आंतरराष्ट्रीय बिबट दिन’ असल्याच्या पार्श्वभूमीवर या बिबट्याची सुखरूप सुटका झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page