उमेश गाळवणकर:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये
स्फूर्तीगीत सादरीकरण,महाराष्ट्र दिनाचे औचित्य..
⚡कुडाळ ता.०२-: जगाला आदर्शभूत ठरणारी महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जतन करूया. देशाच्या उभारणीमध्ये महाराष्ट्राचे योगदान, हौत्तात्म्य पत्करलेल्या शूरविरांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा जपूया.असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित स्फूर्तीगीतात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन श्री. गाळवणकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी एनसीसीच्या छात्रानी अतिशय शिस्तबद्धपणे व सर्वांग सुंदर पद्धतीने जे संचलन केले त्यांचं त्यानी मुक्तकंठाने कौतुक केले. हेच नागरिक उद्या या देशाचे उज्वल भविष्य घडणार आहेत अशा आशावाद व्यक्त केला.
श्री. गाळवणकर म्हणाले, धर्म, प्रांतभेद, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन आपला महाराष्ट्र आपला देश कसा समर्थ होईल या दृष्टीने प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपला देश ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राने सुद्धा तेवढ्या समर्थपणे देशाला साथ देण्याची गरज आहे. त्यासाठी आजच्या तरुण पिढीने प्रयत्न आणि प्रामाणिकतेची कास धरून महाराष्ट्र कसा पुढे जाईल याचा विचार केला पाहिजे. देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी देशासाठी काय करतो आहे याचं भान ठेवून प्रत्येकाने प्रयत्न केल्यास आपला देश प्रगती करू शकतो. यासाठी प्रत्येकाने देश प्रथमचा नारा देत आपली प्रत्येक कृती देशासाठी अर्पण करूया असे सांगत सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कल्पना भंडारी, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रतुष रंजन बिस्वाल, आर्ट कॉमर्स सायन्स महिला कॉलेजचे प्राचार्य अरुण मर्गज, बीएड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, जुनियर कॉलेजचे मंदार जोशी, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या चैताली बांदेकर व इतर शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागाच्या विद्यार्थ्यांनी यानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभाग घेत उत्तम संचलन करत महाराष्ट्रची सांस्कृतिक परंपरा सिद्ध करणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण केलं.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी व फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी केले.
