विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी माझा उपक्रम…

संदीप गावडे:यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न..

⚡ सावंतवाडी, ता. ३० : जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक उपक्रम पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२४-२५’ चा भव्य बक्षीस वितरण सोहळा सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. हा उपक्रम संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.

यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले, “शाळांमध्ये नियोजन करणे सोपे वाटते; मात्र त्या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या सर्व अडचणींवर मात करत हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.” त्यांनी पुढे सांगितले की, केवळ अभ्यासक्रम तयार करणे पुरेसे नसून तो नाविन्यपूर्ण असणेही तितकेच आवश्यक आहे. शिक्षण माणसाला ताकद देते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
यावेळी त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहत त्यांनी देशाला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवणारे संविधान दिले. जन्मापासून ते तरुणपणापर्यंत अन्याय व भेदभाव सहन करूनही त्यांनी सूडभावना न बाळगता सर्व समाजघटकांचा विचार करून सक्षम व प्रगतिशील संविधान निर्माण केले.
संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय आणि संधी मिळाली असून भारताच्या लोकशाहीची भक्कम पायाभरणी झाली आहे. वैयक्तिक संघर्ष बाजूला ठेवून देशाच्या विकासाचा विचार करणारे डॉ. आंबेडकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे दस्तऐवज नसून मानवतेचा, समानतेचा आणि प्रगतीचा मार्गदर्शक ठरले आहे, असेही गावडे यांनी नमूद केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा आणि यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा दिवस खऱ्या अर्थाने “सेलिब्रेशन डे” ठरला. कोणताही विद्यार्थी यश मिळवताना एकट्याने संघर्ष करत नाही; त्यामागे आई-वडिलांचे, विशेषतः आईचे मोलाचे योगदान आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन असते. विद्यार्थ्यांच्या यशामागे संपूर्ण टीमवर्क असते आणि पालक-शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच त्यांचा शैक्षणिक प्रवास घडतो.
या प्रवासातील प्रत्येक टप्प्याचे कौतुक होणे गरजेचे असून त्यासाठीच हा विशेष दिवस निवडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये यशस्वी झाला, तर तो क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा असेल,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीचा आनंद साजरा करावा हा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताणमुक्त राहण्याचा आणि हा दिवस आई-वडील व शिक्षकांसोबत आनंदात घालवण्याचा संदेशही देण्यात आला. “आजचा दिवस हा तुमच्या मेहनतीचा उत्सव आहे. रिलॅक्स रहा, टेन्शन फ्री रहा आणि मनःपूर्वक हा दिवस साजरा करा,” असे आवाहन संदीप गावडे यांनी केले.

You cannot copy content of this page