सिंधुदुर्ग जि.प. सुधारित अंदाजपत्रकाला वित्त समितीची मंजुरी; तब्बल १९.६१ कोटींची वाढ…

⚡सिंधुदुर्गनगरी ता २९-:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या मूळ १४ कोटी ७२ लाख ८ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकात १९ कोटी ६१ लाख ९८ हजार ७०० रुपयांची भरीव वाढ करीत ३४ कोटी ३४ लाख ७९ हजार ३४५ रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास आज वित्त समिती सभेत मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी ते जि प सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद वित्त समितीची बैठक येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वित्त समिती सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजित पिसाळ, सदस्य संजय बोबडी, सुदन कवठणकर, सोनाली घाडीगावकर, वर्षा सांबारी, क्षमा हडकर, सावी लोके, कोषागार अधिकारी अमित मेश्राम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासक कालावधीत तयार करण्यात आलेल्या मूळ अंदाजपत्रकात शासनाकडून ३१ मार्च रोजी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने मोठी वाढ करण्यात आली आहे. परिणामी जिल्हा परिषद स्वउत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुधारित अंदाजपत्रकात विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली असून त्यात अध्यक्ष पदासाठी १ कोटी ७५ लाख ४ हजार ३०० रुपये, सामान्य प्रशासनासाठी १ कोटी ४ लाख ४३ हजार ५०० रुपये, शिक्षण विभागासाठी १ कोटी ९४ लाख ३० हजार ५०० रुपये, बांधकाम विभागासाठी सर्वाधिक ८ कोटी २० लाख ८१ हजार ७०० रुपये, लघू पाटबंधारे ५५ लाख ५ हजार २०० रुपये, आयुर्वेद ६ लाख रुपये, आरोग्य १ कोटी २६ लाख १७ हजार ८०० रुपये, ग्रामीण पाणी पुरवठा १ कोटी ३५ लाख रुपये, कृषी २ कोटी १५ लाख ६८ हजार ६०० रुपये, पशुसंवर्धन २ कोटी ७ लाख ४१ हजार ३०० रुपये, समाज कल्याण ६ कोटी ३ लाख ८२ हजार ७०० रुपये, महिला व बाल विकास २ कोटी ३८ लाख ५० हजार ८०० रुपये आदींचा समावेश आहे.

दरम्यान, सभा आयोजित करताना सभागृहाची उपलब्धता तपासून सकाळच्या सत्रातच बैठका घेण्याच्या सूचना सभापती संतोष साटविलकर यांनी समिती सचिवांना दिल्या. तसेच अंदाजपत्रकीय निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता यावा, या दृष्टीने सर्व विभागानी नियोजन करावे अश्या सूचना यावेळी सभापती संतोष साटविलकर यांनी केली .

You cannot copy content of this page