⚡मालवण ता.२७-:
केंद्र सरकारने २०२३ मध्ये मंजूर केलेले ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक कागदावरच न ठेवता त्याची अंमलबजावणी ‘आज आणि आत्ता’ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी देशभर राबवल्या जाणाऱ्या ‘पोस्टकार्ड अभियानाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शुभारंभ आज मालवण वायरी येथून करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका करत महिलांच्या हक्कासाठी हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाखाली लांबणीवर टाकली जात आहे. काँग्रेसची मागणी आहे की, हे आरक्षण तात्काळ लागू करावे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा आणि नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरातून १० लाख पोस्टकार्ड्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून निषेध नोंदवला जाणार आहे. या मोहिमेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरुवात मालवण तालुक्यातून करण्यात आली असून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची फळी सज्ज झाली आहे. मालवण तालुका महिला अध्यक्षा प्राची माणगावकर आणि शहराध्यक्षा रुपाली फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली मालवणमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. महिलांचे हक्क केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्षात यायला हवेत. जोपर्यंत ३३ टक्के आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत महिला काँग्रेस शांत बसणार नाही, असे यावेळी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी ॲड. अमृता मोंडकर, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, पराग माणगावकर यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. केंद्र सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
