नगरसेवक बाबू कुडतरकर आक्रमक; लेखी प्रस्ताव द्या, लवकर निर्णय घेऊ, नगराध्यक्षांच आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.२४-:
सावंतवाडी शहरातील सुवर्ण कॉलनी येथील जागा हस्तांतरण करण्याचा ठराव घेण्यावरुन नगरपालिकेच्या सभेत गटनेते खेमराज कुडतरकर व सत्ताधारी नगरसेवक यांच्यात एकच खडाजंगी उडाली.मागील दोन सभेंमध्ये मागणी करुनही ठराव घेण्यात आला नाही अशी टिका करत आमचे प्रश्न आणि कामे जाणूनबुजून घेतले जात नाहित असा आरोप करत जोपर्यंत ठराव घेतला जात नाही तोपर्यंत सभा सुरु करु देणार नाही असा आक्रमक पवित्रा कुडतरकर यांनी घेतला.या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये बरीच तू तू मै मै झाली अखेरीस नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले यांनी हस्तक्षेप करत आपण याबाबत लेखी द्या लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
सावंतवाडी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर,मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच विषयांचे वाचन सुरु असताना प्रशासनाला मध्येच थांबवत गटनेते बाबू कुडतरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत मागील दोन सभेत आपण ठराव मांडल्याप्रमाणे माझ्या प्रभागातील सुवर्ण कॉलनी येथील सभागृहासाठी उद्यान व सुशोभिकरण करण्याकरीता ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या जागेचे मालक हयात नसल्याने जागेची हस्तांतरण प्रक्रिया रखडली आहे त्याचे काय झाले नगरपालिकेत प्रशासक असणा–या तत्कालीन प्रांताधिकारी यांनी निधी मंजूर असून देखील हा प्रस्ताव फेटाळला होता असे सांगत हा मुद्दा उचलून धरत सर्वांचे लक्ष वेधले. त्यावर नगराध्यक्षा यांनी आपण पत्र द्या त्यावर निर्णय घेऊ असे सांगितले.दरम्यान मागील सलग दोन सर्वसाधारण सभेत मी ठराव मांडला आहे पत्र देण्याची गरज वाटत नाही यावर तातडीने ठराव घ्या अन्यथा सभा सुरु करु देणार नाही असा पवित्रा घेतला.
