सिंधुदुर्गात टोल वसुलीला तीव्र विरोध…

संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरणाला खडा सवाल:टोलमुक्त सिंधुदुर्ग अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे..

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ओसरगाव येथे टोल नाका सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्राधिकरण दडपशाही, पोलीस बळाचा वापर करून टोल नाका सुरू करणार असेल तर टोलबंदीविरोधात लोकशाही मार्गाने आम्ही लढा देणार आहोत. प्राधिकरणाकडून टोलच्या खाली सिंधुदुर्गवासीयांची आर्थिक लूट करू पाहत आहे. टोलविरोधात पुन्हा सिंधुदुर्गवासीयांनी एकजूट होत लढा दिला पाहिजे. अन्यायकारक असणाऱ्या टोल लुटीपासून जिल्हावासीयांची मुक्तता होण्यासाठी राजकीय पक्षांनी राजकीय पादत्राणे बाजुला ठेवून जिल्हा टोलमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. ओसरगाव येथील टोल नाका सुरू झाला तर जिल्हयावासीयांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. टोल सुरू होऊ नये याकरिता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देणार असल्याचे पारकर यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. पारकर म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. या मार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली करू नये, अशी सिंधुदुर्गवासीयांची भूमिका आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे टोल नाका सुरू करण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. टोल लुटीच्याविरोधात सिंधुदुर्गवासीयांनी एकजूट दाखवून जिल्हा टोलमुक्त करण्यासाठी अभियान हाती घेतले पाहिजे, अशी अपेक्षा पारकर यांनी व्यक्त केली. गोव्या राज्यातून अनेक

राष्ट्रीय महामार्ग जातात. मात्र, त्या ठिकाणी एकही टोल नाही. कोल्हापूर येथे आरबीआय कंपनीने टोल सुरू करण्याची 1 कार्यवाही केल्यानंतर कोल्हापूरवासीयांनी एकजूट दाखवून आरबीआय कंपनीच्याविरोधात आंदोलन करून कंपनीचा टोल सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यासाठी हालचाली केल्यानंतर टोलविरोधात सिंधुदुर्गातील जनता, व्यापारी, राजकीय पक्षांनी एकत्र येत टोल सुरू होऊ दिला नाही. मात्र, पुन्हा प्राधिकरण टोल नाका सुरू करू पाहत आहे. त्यामुळे टोल नाका सुरू होऊ नये म्हणून सर्वांनी कडाडून विरोध केला पाहिजे, असे पारकर म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला टोल नाका सुरू करण्याची एवढी खुरखुमी असेल त्यांनी सिंधुदुर्गाच्या सीमेवर टोलनाका सुरू करावा, जेणेकरून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टोलनाक्यापासून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट थांबेल. ओसरगाव येथील टोल नाक्याची जागा चुकीची आहे. हा टोलनाका मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याठिकाणी टोल वसुली सुरू झाल्यास शासकीय कामानिमित्त ओरोस येथे नेहमीच ये-जा करणाऱ्या सर्वसामान्यांना अर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असे पारकर यांनी सांगितले. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल नाका कशासाठी सुरु करत आहे? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसुली कोणासाठी आणि कशासाठी करीत आहे? असे खडे सवाल पारकर यांनी केले.

प्राधिकरणाने ओसरगाव येथील टोलनाका सुरु केल्यास त्यांना जनभोक्षाचे परिणाम भोगावे लागतील. टोलला आमचा विरोध असून प्रसंगी लोकशाही मार्गाने प्राधिकरणाच्याविरुद्ध जनआंदोलन केले जाईल, असा इशारा पारकर यांनी दिला. ओरसगाव येथील टोलनाका सुरू होऊ नये आणि जिल्हवासीयांना टोलचा आर्थिक भुर्दंड बसू नये याकरिता राज्यकर्त्यांनी सिंधुदुर्गवासीयांच्या टोलमुक्ती भूमिकेबद्दल संवेदनशीलतेने पाहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page