रत्नागिरी व कणकवली आरपीएफची संयुक्त कारवाई..
कणकवली : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना आढळल्या प्रकरणी मारुती दशरथ ठाकूर (वय ५५, रा. नेरूर, कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) अपराध शाखा व कणकवली रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्रितरित्या मंगळवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वेस्थानक येथे केली.
संशयित मारुती ठाकूर हा कुडाळ रेल्वे स्थानक येथील आरक्षण केंद्रावर सातत्याने येत होता.
याबाबत रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी रत्नागिरी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या अपराध शाखेला कळवले. त्यानंतर दोन्ही पथकांनी एकत्रितरित्या कुडाळ रेल्वे स्थानक गाठले. तेथील तपासणीत मारुती ठाकूर हा काळाबाजार करण्यासाठी अधिकची तिकिटे घेत होता, अशी बाब पुढे आली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक राजेश सुरवाडे करीत आहेत.
