⚡कणकवली ता.२३-: भरधाव वेगाने दुचाकी चालवित असताना अचानक ताबा सुटल्याने नरडवे रोडवरील कणकवली बांधकरवाड़ी स्टॉपच्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. सुकर शिवनाथ प्रसाद( वय ४२, रा.गोपालगंज ,बिहार) असे त्याचे नाव आहे.
बिहार येथील मूळ रहिवासी असलेला सुकर शिवनाथ प्रसाद हा जानवली येथील सागर परशुराम कोकीतकर यांच्याकडे कामास होता.तर त्याचा भाऊ अर्जुन प्रसाद हा कणकवली येथील पटकीदेवी मंदीर परिसरात एका भाड्याच्या घरात राहतो. सुकर प्रसाद हा त्यांच्या गावाकडील पंकज कुमार याला कणकवली रेल्वेस्थानक येथे दुचाकी घेवून बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सोडायला गेला होता. तेथून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तो परतत असताना
नरडवे रोडवरील बांधकरवाडी स्टॉपनजिक त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावर खाली पडला. या अपघाता नंतर तेथील स्थानिक लोकांनी गंभीर जखमी झालेल्या त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी त्याला ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याघटनेबाबत अर्जुन याला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
