विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे विद्यार्थ्यांप्रति कार्य प्रेरणादायी…

दादा साईल :विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात..

⚡कुडाळ ता.२३-: विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (इयत्ता ५वी) २०२५-२६ अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. कर्पुरगौर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक किरण चौगुले, मच्छिमार संघटनेचे नेते वसंत तांडेल, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय सचिव श्रीम. विनयश्री पेडणेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संघटक सचिन मदने, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर वजराटकर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी, सचिव महेश पालव, लायन्स क्लब ऑफ कुडाळचे सदस्य जीवन बांदेकर, शिक्षक समिती वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव तसेच प्रतिष्ठानचे सल्लागार झिलू गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून शाश्वत जीवनशैलीचे अभ्यासक ‘कोकणी रानमाणूस’ म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे यांच्या कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यश मिळविणाऱ्या ६० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख पारितोषिक व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. विशेष प्राविण्यप्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांचाही संस्थेतर्फे सन्मानपत्र, रोख पारितोषिक व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कुडाळ कुंभारवाडा शाळेच्या मुलांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले.
सराव परीक्षा प्रमुख रामचंद्र झोरे तसेच सर्व केंद्रसंचालकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सदस्या सौ. शितल गोसावी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग यांचे मोलाचे योगदान लाभले, तसेच गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. किरण चौगुले यांनी गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांना पुस्तके भेट दिली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, चिकाटी आणि सातत्य या गुणांचे महत्त्व पटवून देत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी अशी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान या शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून अशा संस्थांना समाजाचा पाठिंबा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कर्पे व सौ. निशा जाधव यांनी केले. प्रास्ताविक रविंद्रनाथ गोसावी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत एकनाथ जानकर यांनी केले, तर आभार दत्तगुरू कांबळी यांनी मानले.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. भावी पीढीच्या उत्कर्षासाठी सुरू केलेल्या या शैक्षणिक चळवळीला अनेक शिक्षक जोडले जात आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन अध्यक्ष कर्पुरगौर जाधव यांना केले आहे.

You cannot copy content of this page