⚡सावंतवाडी ता.२२-: नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पावसाळापूर्व नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध गटार कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध सात प्रमुख विकासकामांचे भूमिपूजन आज पार पडले.
शहरातील सांडपाण्याची व्यवस्था अधिक सक्षम व्हावी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी नगरपरिषदेने या कामांना प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने बंदिस्त गटारे आणि नाल्यांच्या बांधकामावर यावेळी भर देण्यात आला आहे. नगराध्यक्षांच्या हस्ते आज वंजारी घर ते हळदणकर गिरण बंदिस्त गटार निर्मिती, उभा बाजार विठ्ठल मंदिर ते गोल्डन बेकरीपर्यंत बंदिस्त गटार,
बाळ चोडणकर बिल्डिंग ते मसुरकर दुकान गटार, जयानंद मठकर घर ते भांबुरे घर बंदिस्त गटार, वर्दम घर ते नेवगी घर बंदिस्त गटार निर्मिती, प्रसाद कासकर घरामागील लहान नाल्याचे बांधकाम करून तो बंदिस्त करणे, सबनिसवाडा येथील शरद सावंत यांच्या घरापासून सायबा इंगळे यांच्या घरापर्यंत गटार बांधकाम व फरशी बसवून ते बंदिस्त करणे आदी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान, शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून, ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील असा विश्वास यावेळी नगराध्यक्षांनी व्यक्त केला.यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, नगरसेवक सुनिता पेडणेकर, नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, देव्या सूर्याजी तसेच सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकर,
राजू भालेकर, अमित गवंडळकर, नगरपरिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.
