नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचा संकल्प:पोस्टमार्टेम इमारत, हायमास्ट दिवे, अंतर्गत रस्ता व रुग्ण नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था उभारण्यावर बैठकीत ठराव..
⚡सावंतवाडी,ता.२२-: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सेवा देणा-या वैद्यकीय अधिकारी यांच्या साठी सुसज्ज शासकीय निवास व्यवस्था उभी करण्याचा संकल्प नगराध्यक्ष सौ.श्रध्दाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला.
पोस्टमार्टेम रुमची नवी इमारत, रुग्णालय परिसरात हायमास्क दिवे, अंतर्गत रस्ता, बैठक व्यवस्था आदी भौतिक सुविधा करण्याविषयी बैठकीत निर्णय झाले.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवलेदेसाई, नगरपरिषद आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, वैद्यकिय अधिक्षक ज्ञानेश्वर ऐवळे, सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समिती नियंत्रण एन.बी.रेडकर, संजय लाड,क्रुज फर्नांडिस, पालिका आरोग्य निरिक्षक विनोद सावंत, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, उपस्थित होते.
सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने निवेदन देऊन नगराध्यक्ष सौ.भोसले यांच्याकडे रुग्णालयातील समस्यांबाबत लक्ष वेधले होते. या अनुशंगाने नगराध्यक्षांनी वैद्यकीय अधिक्षक, बांधकाम विभाग , कृती समिती प्रतिनिधी यांची बैठक बोलावली. पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या या बैठकीत सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील भौतिक सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. उपजिल्हा रुग्णालय परिसरात साफसफाई नसल्याने तसेच परिसरात गवत झाडी झुडपे वाढलेली असल्याने परिसर साफसूप करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आखत्यारीत येत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर कार्यकारी अभियंता श्रीमती इंगवलेदेसाई यांनी परिसर चार दिवसात साफ करून देण्याचे कबूल केले. पोस्टमार्टम ची इमारत मोडकळीस आलेली आहे. बाजूला आंब्याचे मोठे झाड वाढल्याने त्याच्या फांद्या पोस्टमार्टम इमारतीला टेकल्याने झाडावरील मुंग्या पोस्टमार्टमच्या इमारतीच्या आत येतात. त्या आंब्याच्या फांद्या तात्काळ छाटण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनास व बांधकाम विभागाला नगराध्यक्ष यांनी दिल्या. रुग्णालय परिसरात आणि पोस्टमार्टमच्या इमारती लगत रुग्णां सोबत येणाऱ्या नातेवाईकांस बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही. लोकांना रुग्णालय परिसरात तासनतास ताटकळत उन्हात उभे राहावे लागते. वेळप्रसंगी रात्रीच्या वेळी पोस्टमार्टम करावे लागते.अशावेळी नातेवाईकांना त्या ठिकाणी बसण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. ही बाब उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या ठिकाणी बसण्यासाठी चार बाकडे बसविण्याचे नगरपरिषदेने मांन्य केले. रुग्णालय शवागृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात येईल असे बांधकाम विभागाच्यावतीने सांगण्यात आले. त्या ठिकाणी लाईट व्यवस्था नसल्याची बाब कृती समिती सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. तेव्हा त्या ठिकाणी हायमॅक्स सुविधा दोन ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले. या रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर किंवा कर्मचारी यांचे क्वार्टर्स अत्यंत नादुरुस्त स्थितीत आहे. ही बाब संजय लाड व एन बी रेडकर यांनी कार्यकारी अभियंता इंगवले यांच्या निदर्शनास आणून दिली. अशा नादुरुस्त इमारतीत डॉक्टर्स वास्तव्यास कसे राहतील असा प्रश्न उपजिल्हा रुग्णालय कृती समिती सदस्यांनी उपस्थित केला असता इमारती नादुरुस्त असल्याचे प्रशासनाने मान्य केले.त्या इमारती दुरुस्त करण्याबाबत उपाययोजना करण्याचा सूचना नगराध्यक्ष सौ श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्ष यांनी बांधकाम विभागास दिल्या. बैठकीत चर्चा अत्यंत समाधानकारक झाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने समाधान व्यक्त केले. नगराध्यक्ष सौ श्रद्धाराजे भोसले, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांचे आभार व्यक्त केले.
