२४ रोजी टेंडर निश्चिती : सरकारला ५७.८८ कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा..
⚡कणकवली ता.२२-: महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्वास जात असताना ओसरगाव टोल नाक्यावरून मे पासून पथकर वसुली सुरू होणार आहे. या टोल नाक्यासाठी केंद्र शासनाने निविदा मागविल्या आहेत. येत्या २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जाणार असून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. ओसरगाव टोल नाक्यावरून टोल वसुलीसाठी यापूर्वी तीन एजन्सी नियुक्त झाल्या होत्या. मात्र या एजन्सीकडून टोल वसुली सुरू होताच टोल विरोधी कृती समिती आणि सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार आंदोलने सुरू केली. त्यामुळे ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्यात आली. यापूर्वी १४ जून २०२३ रोजी टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू करण्यात आली होती. मात्र आंदोलनानंतर ही टोल वसुली बंद करण्यात आली. त्यानंतर गेली तीन वर्षे टोल नाका सुरू होण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ओसरगाव टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू करण्यासाठी १७ एप्रिल रोजी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यात जानवली पूल ते पत्रादेवी या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांसाठी टोल वसुलीसाठी एजन्सी निश्चित केली जाणार आहे. यात दरवर्षी वाहनांकडून ५७.८८ कोटींचा टोल वसूल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
२३ एप्रिल रोजी ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे. तर २४ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथील महामार्ग विभागाच्या कार्यालयात निविदा उघडल्या जाणार असून त्याच दिवशी ठेकेदार निश्चित होणार आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरून कार, जीप आणि व्हॅन या सारखी हलकी वाहने जाण्याचे प्रमाण सर्वाधिक ४९ टक्के आहे. बस आणि ट्रक (दोन ॲक्सल) वाहनांचे प्रमाण २७ टक्के, मल्टी ॲक्सल वाहनांचे प्रमाण १९ टक्के असल्याचेही निविदा नोटिशीमध्ये नमूद केले आहे.
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे २०२६ अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे. दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याचीही कार्यवाही महामार्ग विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गातील ओसरगाव हा टोल नाका सर्वप्रथम सुरू करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे. महामार्ग विभागाने जाहीर केलेल्या निविदांमध्ये स्थानिक वाहनांना टोल करातून वगळण्याबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.
अशी होणार टोल वसूली
कार, जीप, व्हॅन साठी : वन वे १२५ रूपये, जाणे-येणे (एकच फेरी) १९० रूपये, मासिक पास ४१७० तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी ६५ रूपये.
मिनीबस अणि हलक्या वजनाच्या वाहनांसाठी : वन वे २०० रूपये, जाणे-येणे (एकच फेरी) ३०५ रूपये, मासिक पास ६७४० तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी १०० रूपये.
दोन ॲक्सल बस आणि ट्रकसाठी : वन वे ४२५ रूपये, जाणे-येणे (एकच फेरी) ६३५ रूपये, मासिक पास १४१२० तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी २१० रूपये.
व्यावसायिक वाहनांसाठी : वन वे ४६० रूपये, जाणे-येणे (एकच फेरी) ६९५ रूपये, मासिक पास १५४०५ तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी २३० रूपये.
अजवड वाहनांसाठी : वन वे ६६५ रूपये, जाणे-येणे (एकच फेरी) ९९५ रूपये, मासिक पास २२१४५ तर सिंधुदुर्गात नोंदणीकृत वाहनांसाठी ३३० रूपये.
