आम दीपक केसरकर :सर्वांच्याच प्रयत्नांना यश;हक्काच्या जमिनींच्या सातबारांचे वाटप..
⚡सावंतवाडी ता.१०-: गेळे पर्यटन स्थळ विकसित करून रोजगार निर्माण करण्यासाठी शासनाने कबुलायतदार गावकर जमिनी वाटप केल्या आहेत. पर्यटनासाठी कमर्शियल आणि शेती विषयक उपक्रम हाती घेण्यासाठी जमिनी वाटप करताना आनंद होत आहे. सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले असून आता चौकुळ आणि आंबोली येथील जमिनी भूमिअभिलेख मार्फत मोजून घेवून वन संज्ञा जमिनीसह वाटप करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले. गेळे पर्यटन स्थळांवर प्रत्येकाला जमीन वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान आणि गेळे येथे शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर जमिनी वाटप समारंभ प्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार श्रीधर पाटील, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच सागर ढोकरे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, दाणोली पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी, चौकुळ सरपंच गुलाब गावडे, उपसरपंच विजय गवस आदी उपस्थित होते.
माजी मंत्री आ. केसरकर म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे, गेळेलेतील कबुलायतदार गांवकर जमिनी वाटप करताना आनंद होत आहे. गेळे, आंबोली ,चौकुळ मधील वनसदृश्य जमीन देखील एकत्रित वाटप व्हावी अशी मागणी होती. मात्र, गेळे गावातील ग्रामस्थांनी सामंजस भूमिका दाखवून कबुलायतदार गावकर जमिनी वाटप करण्यास प्राधान्य दिले आहे. चौकुळ आणि आंबोलीमध्ये भूमी अभिलेख मार्फत मोजणी व्हायची आहेत. जमीन मोजणी झाल्यानंतर वनसदृश्य जमिनी सह कबुलातदार गावकर जमीन वाटप होईल, त्यावेळी गेळेमधील देखील वनसदृश्य जमीन वाटप करण्यात येईल. प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार वनसदृश्य जमिनीचा निर्णय झालेला आहे. मात्र, त्यावर वनविभागाने अपील केलेले असल्याने तो प्रश्न रेंगाळलेला आहे, तो लवकरच सुटेल असे आमदार केसरकर म्हणाले.
तसेस, सिंधूरत्न योजनेतून पर्यटनासाठी बंगले मंजूर केलेले आहेत. तसे गेळे, चौकुळ व आंबोली ते भागात करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्या चौकुळ व आंबोली ग्रामपंचायतला प्रकल्प दिलेले आहे. या भागात दरवर्षी तीन लाख पर्यटन येतात. त्या पर्यटकांना पायाभूत सुविधा आणि पर्यटनासाठी सुविधा मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेळेमध्ये साहसी क्रीडा स्पर्धांसाठी प्रकल्प हाती घेणार आहे. विद्युत रोषणाई, साहसी क्रीडा प्रकार करण्याचा मानस आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटक वाढतील आणि या पर्यटकांसाठी गेळे , आंबोली व चौकुळ भागामध्ये रीघ लागेल. गेळे गावातील लोकांनी जमिनी मिळाल्या आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटक निवास देखील करावीत. याशिवाय, या भागात देशी गायीच्या प्रकल्प हाती घेतलेला आहे. एवन दुधाला मोठी मागणी आहे. त्यासाठी दूध डेरी देखील करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, सरकारच्यावतीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. बचत गटांनी देखील यामध्ये प्राधान्य घ्यावे असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न निकाली लागण्यासाठी माझ्या सह पालकमंत्री नितेश राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अशा सर्वांचे सहकार्य लागले लाभलेले आहे. खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसा दिवशी जमिन वाटप होत असल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे. याशिवाय जिल्हा परिषद संदीप गावडे यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत. चौकुळ, आंबोली व गेळे गावातील वन सदृश्य जमीन प्रश्न सुटेपर्यंत लढा सुरू राहणार आहे असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. तर, शक्तीपीठ मार्ग देखील येथून जाणार आहे. त्याचा फायदा देखील होईल. वन्यप्राणी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. त्याबाबत मी वनमंत्र्यांशी बोललो आहे. गेळे गावातील एकोपा लोकांनी कायमच ठेवावा, तो गेळे गावातील सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच एक बैठक आयोजित करून या परिसरासह विधानसभा मतदारसंघातील प्रश्नावर चर्चा होणार आहे असे म्हणाले.
जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे म्हणाल्या, आज आनंदाचा दिवस आहे. जमीन वाटप करण्यात आली असून सातबारा उतारा वाटप करण्यात आले आहेत. शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून तुम्हाला न्याय हक्क मिळवून दिला आहे. आपल्या सर्वांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. याप्रसंगी कबुलयतदार गावकर जमिनी आराखडा तयार करणाऱ्या आरती गावडे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांचा सत्कार आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या जि.प. सदस्य संदिप गावडे व सरपंच सागर ढोकरे यांचाही सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्यानंतरही गेली कित्येक वर्ष रखडलेला गेळे येथील कबुलायतदार गांवकार जमीनप्रश्न निकाली निघाला असून जवळपास २३० जणांना हक्काचा सातबारा मिळला आहे. जवळपास २८८ हेक्टर क्षेत्रात २३० हून अधिक खातेदार आहेत. या सर्वांना आता हक्काचा सातबारा मिळाला आहे. ५५ गुंठे जागेत शेतीसाठी ५० गुंठे, पर्यटन विकासासाठी ५ गुंठे जागेच वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. यावेळी विरपत्नी सिताबाई गवस (नेतर्डे) , मनोहर बंड, काशिराम गवस, महादेव नार्वेकर, अर्जुन कदम, उत्तम कदम, धोंडी कदम, महादेव पवार व अन्य शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आले. त्यांचे
सरपंच सागर ढोकरे व उपसरपंच विजय गवस यांनी स्वागत केले. यावेळी तातोबा गवस,मनोहर बंड, आनंद गावडे, नितीन गवस, बाळा गवस, आरती आनंद गावडे, पी डी गावडे, शशिकांत गावडे यांच्यासह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.
