⚡कणकवली ता.०४-: शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली. आचरा रोडसारख्या नेहमी गजबजलेल्या मार्गावर ही चोरी घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आचरा रोडवरील सना कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने तसेच काही अंतरावर असलेल्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या बाजूच्या राज मेडिकलसह आणखी तीन दुकानांची शटर उचकटून चोरट्याने आत प्रवेश करत चोरी केली. विशेष म्हणजे, या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्याने सहजपणे आपला डाव साधल्याचे समोर आले आहे.
आचरा रोड हा नेहमीच वर्दळीचा मार्ग असून येथून काही अंतरावरच कणकवली पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या जवळच अशा प्रकारे चोरी होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. विशेष म्हणजे, या घटनेबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्याचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
