कुडाळ मतदारसंघातील शासकीय आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर…

आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवावा:मनसे उप जिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर यांची मागणी..

⚡कुडाळ ता.०३-: येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था अक्षरशः व्हेंटिलेटर वर आहे. त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन विधानसभेच्या पुढील अधिवेशनात याबाबत आवाज उठवावा, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर यांनी शासकीय रुग्णलयाच्या ढिसाळ काराभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. कुडाळ येथील महिला बाल रुग्णालय येथून अत्यावश्यक गंभीर बाब म्हणून गोवा बांबुळी येथे पाठवलेल्या महिलेची गोवा बांबुळी येथे नॉर्मल डिलिव्हरी, ही बाब गंभीर आहे.
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या गेल्या तिन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडल्या. परंतु यामधील एक मुख्य समस्या म्हणजे आरोग्य व्यवस्था. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ मालवण मधील रुग्णालये तसेच महिला बाल रुग्णालय यांच्या आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्षात पाहणी करून त्याची योग्यरित्या उपाययोजना करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा. आणि नुसता आवाज उठवूनच चालणार नाही तर त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलावीत.
तसेच सद्यस्थितीमध्ये कुडाळ ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिस्थिती पाहता त्या ठिकाणी उपलब्ध कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले डॉक्टर यांना वेळेवर वेतन देखील मिळत नसल्यामुळे अनेकदा ते काम सोडून जातात व त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. आता जनतेसाठी नुसत्या घोषणा नको तर प्रत्यक्षात मूलभूत प्रश्नावर तोडगा हवा त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्षात जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी या पत्रकाद्वारे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page