आरोंद्यात गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा…

गॅस समस्या बाबत दखल न घेतल्यास तहसीलदारांना देणार निवेदन :- सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर..

⚡सावंतवाडी ता.०३-: आखाती देशातील युद्धाची झळ गावागावात पोहचली असून सध्या सगळीकडे गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी बरीच कसरत करावी लागत असून त्यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

आरोंदा ग्रामपंचायत कार्यालय येथे गॅस पुरवठा करणारी गाडी काल गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी गॅस सिलेंडर वितरण करण्यासाठी आली असता,गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. गॅस सिलेंडर साठी सकाळ पासूनच ग्राहक उभे होते.
मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅस तुटवड्यामुळे ग्राहकांची धावपळ होताना दिसत आहे.
काल आरोंदा येथील वृद्धांनासुद्धा याचा फटका बसल्याचे दिसले,गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील गॅस लाभधारकांना त्रास सहन करावा लागल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांनी संबंधिताना याचा जाब विचारला.त्यावर त्यांनी इंटरनेट चालत नाही तसेच अन्य कारणे पुढे केली.
श्री देऊलकर यांनी, गॅस सिलेंडर पुरवठा करणारी गाडी ही ग्रामपंचायत कडे सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरित करते,त्यामुळे तीन ते चार किलोमीटर वरील ग्राहकांना,वृद्धांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले.या समस्येबाबत आपण तहसीलदार यांना भेटून निवेदन देणार असल्याचे सांगताच,संबंधितांनी पुढील गॅस वितरण वेळी याबाबत नियोजन करून घरपोच सेवा देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत प्रशासक सायली साळगावकर,ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गॅस सिलेंडर मिळणार या आशेने येथील ग्राहक सकाळ पासूनच लांबच लांब रांगा लावताना दिसतात.मात्र यात वृद्ध व्यक्तींना,लाभधारकांना वेळ आणि आर्थिक नुकसान सोसून उन्हात रांगेत उभे राहून वाट पाहावी लागत आहे.तीन ते चार किलोमीटर वरून एखादे भाड्याने वाहन घेऊन सिलेंडर घेऊन गॅस पुरवठा वितरण ठिकाणीं घेऊन जाणे म्हणजे आर्थिक नुकसान होत आहे, गॅस पुरवठा करणारे मात्र वाहतुकीचा खर्च वसूल करून सुद्धा गॅस सिलेंडर गावात जावून देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांनी नाराजी व्यक्त करून याबाबत आपण तहसीलदार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page