शब्बीर मणियार: चार दिवसात वीज वितरण कंपनीने दखल न घेतल्यास खुर्चीवर बसू देणार नाही..
⚡सावंतवाडी ता.०३-: येथील बुरान गल्ली परिसरात वीज वितरण कंपनीचा मोठा हलगर्जीपणा समोर आला असून येथील एका विद्युत खांबावरील डीपी बॉक्स गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे या खांबाच्या खाली वीजवाहिन्यांच्या तारांचे जाळे पसरलेले असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत, ठाकरे शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
बुरान गल्ली या ठिकाणी लहान मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. वीज खांबावरील फ्यूज पेटी उघडी असल्याने आणि जमिनीलगत तारा असल्याने एखादे लहान मूल किंवा नागरिक या तारांच्या संपर्कात येऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शब्बीर मणियार यांनी महावितरणच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. या ठिकाणी खेळणाऱ्या लहान मुलांना काही इजा झाली किंवा एखादी जीवघेणी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन एखाद्याच्या जीवाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल त्यांनी केला. येथील फ्यूजचा डबा तात्काळ दुरुस्त करून बंद करण्यात यावा. जर हा डबा तातडीने बंद केला नाही, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला कार्यालयात खुर्चीवर बसू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा श्री. मणियार यांनी घेतला आहे.
