शिक्षकांची मागणी: जिल्हा परिषद अध्यक्षांची सकारात्मक भूमिका..
⚡ओरोस, ता. २ -: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन सन २००७, २००८ व २००९ मध्ये सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. यावर अध्यक्षांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रस्तावांना गती देण्याचे आश्वासन दिल्याने शिक्षकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
सन २००७ मध्ये स्थानिक डीएड बेरोजगारांना मोठ्या संघर्षानंतर सेवेत प्रवेश मिळाला होता. या प्रक्रियेस माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. प्रत्यक्षात ही भरती २००२ मध्ये अपेक्षित होती; मात्र प्रशासनाच्या धोरणात्मक त्रुटींमुळे विलंब झाला. परिणामी १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती झाल्याने हे शिक्षक जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित राहिले.
दरम्यान, राज्य शासनाच्या १ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या प्रकरणांमध्ये, त्या आधारे नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून शिक्षकांनी १३ मे २०२४, १२ नोव्हेंबर २०२४ आणि ६ जानेवारी २०२५ रोजी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, अद्याप शिक्षण विभागाकडून त्यावर कार्यवाही झालेली नाही, अशी खंत संघटनेने व्यक्त केली.
प्रस्ताव सादर करून जवळपास दोन वर्षे उलटूनही निर्णय न झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने अध्यक्षांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तात्काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांना बोलावून चर्चा केली. चर्चेनंतर यादीतील सर्व पात्र शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली.
या शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाळवी, जिल्हा सरचिटणीस महेश पालव, संजय शेडगे, नरेंद्र सावंत, प्रशांत वारंग, कुर्लेकर, विजय गावडे, अनिल वरक, लक्ष्मण बरागडे, विरनोडकर सर, भास्कर गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना निवेदन देताना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाळवी, जिल्हा सरचिटणीस महेश पालव व अन्य
