खा राणेंच्या वाढदिवसाचे निमित्त:जिल्हाभरात विविध क्रीडा स्पर्धा:प्रभाकर सावंत यांची माहिती..
ओरोस ता २
माजी मुख्यमंत्री खा नारायण राणे यांचा १० एप्रिल २०२६ रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त भाजप पक्षाने संसद कोकण समृद्ध महोत्सव २०२६ चे आयोजन केले आहे. यानिमित्त पक्षाच्यावतीने प्रत्येक तालुक्यात जिल्हा, राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजन प्रसन्ना देसाई उपस्थित होते. खा राणे यांचा वाढदिवस म्हटला की पूर्ण कोकण वासियांना वेगळी उत्सुकता असते. १० एप्रिल या दिवसाची सर्वजण वाट पाहत असतात. केवळ भाजप पक्षाचेच नाहीतर अन्य पक्षाचे कार्यकर्ते हा दिवस आनंदात साजरा करतात. त्यातच यावर्षी ७५ वा वाढदिवस असल्याने जिल्हा भाजपने संसद कोकण समृद्ध महोत्सव २०२६ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे श्री सावंत यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, ५ एप्रिल रोजी कणकवली नगरपंचायत हॉल येथे १५ वर्षाखालील एकेरी, महिला खुला एकेरी, ४० वर्षांवरील डबल, पुरुष एकेरी, पुरुष डबल या गटात बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पुरुष डबल गटासाठी आणि ४० वर्षांवरील पुरुष डबल गटासाठी दहा हजार आणि सहा हजार रुपये असे विजेत्या, उपविजेत्यांना रोख बक्षीस ठेवण्यात आले असून अन्य गटांसाठी पाच हजार आणि तीन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. वैभववाडी तालुक्यात १० एप्रिल रोजी दुर्गामाता मैदान येथे कुस्ती स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ५ एप्रिल रोजी देवगड येथे सायक्लोथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यात १० एप्रिल रोजी आंतरराज्य बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धिबळ स्पर्धेतील तीन क्रमांकांना मिळून ३५ हजार रुपये तर कॅरम स्पर्धेतील तीन क्रमांक विजेत्यांना १८ हजार ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. मालवण तालुक्यात टोपीवाला हायस्कूल पटांगण येथे १० व ११ रोजी डे नाईट बास्केट बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम २५ हजार, द्वितीय १० हजार आणि तृतीय पाच हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यासाठी १० एप्रिल रोजी नगरपरिषद हॉल येथे टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्यांना पाच हजार आणि तीन हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
वेंगुर्ले तालुक्यासाठी ११ आणि १२ एप्रिल रोजी आंतरराज्य हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना २० हजार, दहा हजार आणि पाच हजार रुपयांची दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दोडामार्ग तालुक्यात ८ रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास १५ हजार रुपये आणि उपविजेत्या संघाला दहा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.
फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी: पत्रकार परिषदेत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सरचिटणीस रणजीत देसाई, संयोजक प्रसन्ना देसाई
