रिल्स मालवणी तर्फे ४ एप्रिलला मालवणी अवॉर्ड सोहळा…

यंदाचा कलासन्मान पुरस्कार ओमप्रकाश चव्हाण यांना जाहीर:मालवणी भाषा दिनाचे औचित्य..

⚡कुडाळ ता.०२-: ‘सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो’ अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड २०२६ सोहळा येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे हे मालवणी अवॉर्ड शो चे चौथे वर्ष आहे. ४ एप्रिल रोजी मालवणी भाषा दिन असून या दिवशी मराठा समाज सभागृहात सायंकाळी ७ वाजता हा सोहळा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ दशावतारी कलाकार कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांना यंदाचा ‘कलसिंधु सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विविध कॅटेगिरीमध्ये अवॉर्ड वितरण होणार आहे. अशी माहिती रिल्स मालवणीचे निलेश गुरव आणि क्रिएटिव्ह हेड तेजस मसके यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
रिल्स मालवणी आयोजित मालवणी अवॉर्ड शो सोहळा २०२६ बाबत माहिती देण्यासाठी कुडाळ मराठा समाज सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, क्रिएटीव्ह हेड तेजस मसके, सदस्य निलेश गुरव, रामचंद्र आईर, पूजा सावंत-उपळेकर, उपेंद्र पवार, भावेश तळवलकर उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना निलेश गुरव म्हणाले की, दरवर्षी मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. एखाद्या बोलीभाषेचा दिन साजरा होणारी मालवणी ही एकच भाषा आहे. या दिनाचे औचित्य साधून गेली तीन वर्षे रिल्स मालवणी यांच्यातर्फे मालवणी अवॉर्डस दिली जातात. यामध्ये सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार , सर्वोत्कृष्ट मालवणी चित्रपट, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालवणी वेबसीरीज, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्यसंस्कृती, सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट मालवणी रिल या कॅरॅगिरी मध्ये अवॉर्ड दिली जाणार आहेत.
‘कोकण वाचवा’ या विषयावर यावर्षी रील स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचा निकाल देखील यावेळी जाहीर करण्यात येणार आहे आणि पारितोषिक वितरण देखील होणार आहे. तसेच यंदाचा ‘कलासिंधू सन्मान’ पुरस्कार ज्येष्ठ दशावतारी कलाकार कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण याना प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री. गुरव यांनी सांगितले.
क्रिएटिव्ह हेड तेजस मसके म्हणाले, हा कार्यक्रम फक्त इन्फ्लुइन्सर साठी नाही, तर सर्व मालवणी भाषिक आणि मालवणी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. मसके आणि अध्यक्ष तुषार तळकटकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page