सावंतवाडी ता.०१-: शिक्षण क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १( तालुका वेंगुर्ला )येथील मुख्याध्यापिका सौ. वैभवी वसंत रायशिरोडकर यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे.
हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन समिट २०२५–२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमास राज्यभरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते व शिक्षणतज्ज्ञ दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते सौ. वैभवी रायशिरोडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच कार्यक्रमास पिंपरी चिंचवडच्या महापौर सौ शर्मिला बाबर, छत्रपती संभाजी नगर उपजिल्हाधिकारी शुभम पवार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर तसेच शिक्षण मंडळ सभापतीनानासाहेब शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय संस्थापक सुदाम शेंडगे, संस्थेचे पदाधिकारी तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रायशिरोडकर यांनी आपल्या शाळेत विविध अभिनव उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि मूल्याधिष्ठित शिक्षण रुजवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी या सन्मानाचे श्रेय आपल्या सहकारी शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांना दिले आहे.
