महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी….

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न फळाला:कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी; निर्यातीत ऐतिहासिक वाढ..

⚡कणकवली ता.०१-:
महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मत्स्यव्यवसायाला मिळालेल्या चालनेमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून 2020-21 मधील 3 हजार 684 कोटींच्या तुलनेत निर्यात दुप्पट झाली आहे. निर्यातीचे परिमाणही वाढून वार्षिक 2.27 लाख मेट्रिक टनांवर पोहोचले आहे.
कोकण किनारपट्टी हा या यशाचा कणा ठरला असून, विशेषतः कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत मोठा वाटा आहे. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये कोकणातील कोळंबीला मोठी मागणी असून तिची गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशी ग्राहकांमध्ये ती लोकप्रिय ठरत आहे.
मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि निर्यातक्षमतेत वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मच्छीमारांना थेट जागतिक बाजारपेठांशी जोडण्यास मदत झाली आहे.
भारताच्या एकूण मत्स्य निर्यातीत अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली असून 2024-25 मध्ये 22 हजार 723 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. त्यानंतर चीन (10 हजार 668 कोटी), युरोपियन युनियन, दक्षिण-पूर्व आशिया आणि जपान या देशांमध्येही भारतीय मासळीला मोठी मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाढत्या उत्पादन खर्चासारख्या आव्हानांवर मात करत महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेशासारख्या राज्यांच्या बरोबरीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
एकूणच, मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या धोरणात्मक निर्णयांमुळे आणि कोकणातील मच्छीमारांच्या परिश्रमामुळे महाराष्ट्राची कोळंबी आता सातासमुद्रापार पोहोचून राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी झेप देत आहे.

You cannot copy content of this page