⚡कणकवली ता.०१-: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने “सिंधुनायक चषक २०२६” या राष्ट्रीय स्तरावरील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक ५ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान नाधवडे (ता. वैभववाडी) येथील श्री महादेव मैदानावर पार पडणार आहे.
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत देशभरातील विविध संघांचा सहभाग असणार असून अनेक राष्ट्रीय खेळाडू मैदानात उतरतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच गोवा येथील क्रीडाप्रेमींना नामांकित व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेला विविध मंत्री, मान्यवर, उद्योजक, कलाकार उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळे भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार असून प्रेक्षकांसाठी प्रशस्त आसन व्यवस्था, डी.जे. साऊंड सिस्टीम तसेच सायंकाळी ७ वाजल्यापासून सामने खेळवले जाणार आहेत. नामांकित समालोचकांची उपस्थिती या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ लाख ७५ हजार ५७५ रुपये, तर द्वितीय पारितोषिक २ लाख ७५ हजार ५७५ रुपये ठेवण्यात आले आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक मोटरसायकल, तसेच मॅन ऑफ द मॅच आणि इतर खेळाडूंना विविध रोख व आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
याचबरोबर ७५ दिव्यांगांना भेटवस्तू देण्यात येणार असून त्यापैकी ३ जणांना लकी ड्रॉद्वारे दिव्यांगांसाठी मोटरसायकल देण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी दररोज लकी ड्रॉ आयोजित करण्यात येणार असून अंतिम दिवशी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉ काढून विजेत्यांना प्रत्येकी एक इलेक्ट्रिक स्कुटर देण्यात येणार आहे. ८ व ९ एप्रिल रोजी नामांकित खेळाडू व सेलिब्रिटींची उपस्थिती या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या भव्य राष्ट्रीय स्पर्धेचा लाभ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच गोवा राज्यातील क्रीडाप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
