अनुष्का गवंडे उंचउडीमध्ये प्रथम तर शुभ्रा गवंडे लांबउडीमध्ये द्वितीय..
⚡सावंतवाडी ता.३०-: तालुक्यातील मळगाव सावळवाडा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शारदा विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
अनुष्का देवदास गवंडे हिने उंचउडी मध्ये प्रथम क्रमांक तर शुभ्रा परशुराम गवंडे हिने लांबउडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ (२८ मार्च रोजी) डॉन बॉस्को स्कूल, ओरोस येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनुष्का गवंडे व शुभ्रा गवंडे या दोन्ही विद्यार्थिनी क्रीडा शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या आहेत.
या यशासाठी विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा मोरजकर तसेच शिक्षिका पूजा पवार, अमृता बांदेकर व शिक्षक सागर खटावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम सावळ, समिती सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व स्तरांतून या यशाचे कौतुक होत आहे.
