शिरोडा ग्रामस्थांची मागणी: पोलिसांना निवेदन केले सादर..
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
शिरोडा गावात ब-याच ठिकाणी चायनीय सेंटर, समुद्र किनारी, मिठागर परिसर, उपजिल्हा रुग्णालय शिरोडाच्या मागील बाजूस या परिसरात गांजा, चरस, अमली पदार्थ रात्रौ राजरोसपणे विक्री करुन सेवन केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत शिरोडा परिसरात नागरिकांच्या असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या प्रकारामुळे अमली पदार्थ विक्री करणा-यांकडून गुंडगिरी करुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पर्यटनदृष्टया महत्वाच्या असलेल्या शिरोडा गावात अनैतिक धंद्यांना आळा घालावा, अन्यथा या विरुद्ध मोठे आंदोलन करण्यातं येईल. शिरोडा गावात अमली पदार्थ विक्री सह वेश्या व्यवसाय सुरु असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत त्वरित पुढील कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिरोडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यातं आली आहे. यावेळी शिरोडा ग्रामस्थ अमोल परब, दत्तगुरु परब, मयुरेश शिरोडकर, भिवा गावडे, भरत शेटये, राहुल गावडे, अमित गावडे, कौशिक परब, गणपत साळगावकर, प्रशांत गावडे, देऊ परब, दीक्षांत परब, विजय परब, उद्धव परब, सचिन जेठे, वेदांत परब, निखिल गावडे, ओम परब, आदित्य घोडके, मनोज उगवेकर आदी उपस्थित होते.तसेच जबर मारहाण प्रकरणातील ( बबलू परब यास 17 टाके पडले आहेत ) शिरोडा गावातील संबंधित संशयित व्यक्ती दर्शन गडेकर यास तात्काळ अटक करून कारवाई करावी, अशा मागणीचेही निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान शिरोड्यातील गंभीर प्रकाराबाबत त्वरित दखल न घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांची सोमवारी भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे यांनी दिली.
