सावंतवाडीत स्वच्छता व्यवस्थेला बळकटी…

नवीन सक्शन व्हेईकल प्राप्त: सोमवारी होणार शुभारंभ; सुधीर आडीवरेकर यांची माहिती..

सावंतवाडी ता.२८-: शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेला अत्याधुनिक सक्शन व्हेईकल प्राप्त झाले आहे. गटार, नाले तसेच सेप्टिक टँक साफसफाईसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यदायी वातावरणाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. याचे उद्घाटन सोमवारी नगराध्यक्ष तसेच प्रभारी नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत या वाहनाचं शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी दिली.

ते म्हणाले, साफसफाईच्या कामांमध्ये अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः सांडपाणी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता या नवीन वाहनामुळे कामे जलद, सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने करता येणार आहेत.

नगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील साचलेले पाणी, गटारातील घाण आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार असून, स्वच्छ व निरोगी सावंतवाडीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, असे देखील आडीवरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page