श्री. दिलीप गिरप ; मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपदी युवराज जाधव यांची निवड..
⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरपरिषद कॅम्प येथील स्टेडियम भाडेपट्ट्याने नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यासंदर्भात आज शुक्रवारी (27मार्च ) सर्वसाधारण सभेत विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर याबाबतचा पुढील 30 वर्षासाठी भाडेपट्टा करार करण्यासंदर्भात शासनास तातडीने पत्रव्यवहार करण्याचे सर्वानुमते ठरले.
वेंगुर्ला नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी 27 मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली
संपन्न झाली. सर्वप्रथम दिलीप गिरप यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, तसेच उपनगराध्यक्ष विनायक उर्फ सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, संदेश निकम, दाजी परब, प्रशांत आपटे, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, युवराज जाधव, श्री. गिरप, रवी शिरसाट, विनय नेरुरकर, सचिन शेट्ये, नगरसेविका आकांक्षा परब, शितल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, रिया केरकर, गौरी मराठे, समिधा रेडकर सुमन निकम, लीना म्हापणकर, गौरी माईणकर तसेच प्रशासकीय अधिकारी अभिजीत पाटील, विशाल होडावडेकर, स्नेहल शिंदे, सागर चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सुद्धा वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल अदा करण्याचे ठरविण्यात आले. खाजगी सोसायट्याकडून आलेल्या रस्ता करून देण्याच्या पत्रावर चर्चा होऊन अशा खाजगी सोसायटीमधील रस्ता नगरपरिषद कडे हस्तांतरित करून घेण्यात यावा व त्यानंतर निधी खर्च करण्यात यावा, असे ठरले. मांडवी जलबांदेश्वर येथील ट्राफिकच्या समस्येवर तेथील स्टॉल धारकांची मीटिंग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. मच्छीमार सोसायटी यांनी दिलेल्या पाणीपुरवठा करण्याच्या पत्रावर विचारविनिमय होऊन तिलारी प्रकल्पाचे पाणी या सोसायटींना देण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यासंदर्भात अंदाजपत्रक बनवून पाठपुरावा करण्याचे ठरले. यावेळी मागासवर्गीय कल्याण समिती सभापती पदी नगरसेवक युवराज जाधव यांची निवड करण्यात आली, तर समिती सदस्य म्हणून समिधा रेडकर, शीतल आंगचेकर, रवी शिरसाट, सुधीर पालयेकर यांची निवड करण्यात आली. कुडाळ नगरपरिषद चा ओला कचरा वेंगुर्ला नगरपरिषद कडे घेण्यासंदर्भात चर्चा होऊन, सद्यस्थितीत वेंगुर्ला नगरपरिषदकडे स्वतःचा 3 टन कचरा असल्याने कुडाळ नगरपरिषद चा कचरा घेतल्यास आपल्या प्रकल्पावर लोड येऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारचा कचरा न घेण्याचे ठरविण्यात आले. भोगवे ग्रामपंचायतला घनकचरा व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एप्रिलमध्ये पत्र देण्याचे ठरले. यावेळी नगरसेवक प्रशांत आपटे, संदेश निकम, सुहास गवंडळकर यांनी विविध विषय मांडले. यावेळी विविध विषयावर चर्चेवेळी नगरसेवक संदेश निकम यांनी विविध मुद्द्यावर प्रशासनास धारेवर धरले. आज सर्वसामान्य नागरिकांना घरपट्टी वसुली न झाल्यास कारवाई केली जाते, मग तहसीलदार कार्यालय तसेच अन्य प्रमुख आस्थापनाची घरपट्टी वसुलीस दिरंगाई का, असा सवाल संदेश निकम यांनी उपस्थित केला. त्यामुळे तहसील ची असलेली 58,760 रुपये एवढी घरपट्टी वसुली 31 मार्च पूर्वी करण्यात यावी, असा ठराव संदेश निकम यांनी मांडला. वेळीच वसुली न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी सभागृहात दिला. पालकमंत्री नितेश राणे यांनी नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम यांना पन्नास लाख विकासकामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे, असे संदेश निकम यांनी सभागृहात सांगितले. परंतु विकासकामाबाबत हस्तक्षेप तसेच अधिकाऱ्यांनी सभागृहात विविध विषयावर चुकीची माहिती पूरविल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर स्वतः उपोषणास बसणार असल्याचा इशारा संदेश निकम यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी शबरी आवास योजना बाबत मुख्याधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी भूमिगत विजवाहिन्या, शहरातील रस्ता व अन्य विकासकामे मुद्द्यावर चर्चा झाली. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी विविध विषय प्रभाविपणे हाताळताना शहरातील काही विकासकामे, विविध मुद्दे यावर विशेष सभेत अथवा पुढील सभेत घेण्याचे सूचित केले. वेंगुर्ला बंदर येथील वाढते पर्यटक पाहता पुढील कालावधीत येथील ट्राफिक समस्या सोडवून नागरिकांना तसेच पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी उपाययोजना करण्यातं येणार आहेत, असे दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.यावेळी सभेनंतर
मागासवर्गीय कल्याण समिती सभापती युवराज जाधव यांचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी अभिनंदन केले.
