⚡कणकवली ता.२७-: वत्सला प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मातोश्री द्रोपदी कुंभार लोकसाहित्य संशोधन व लोककला जतन पुरस्कार वर्ष 2025-26 साठी जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्य संशोधनासाठी मोहन रणसिंग तर लोककला जतनासाठी शिवदास कुमार मसगे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मोहन कुंभार यांनी दिली.
मातोश्री द्रोपदी कुंभार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील वर्षापासून वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोककला संशोधन व लोककला जतनासाठी पुरस्कार देण्यात येत आहेत. कष्टकरी व कृषी संस्कृतीशी निगडित लोककला झपाट्याने लोप पावत असल्याने या लोककला टिकवणे, त्यांचे संवर्धन करणे व पुढील पिढीकडे हस्तांतरण व्हावे यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन म्हणून हे पुरस्कार दिले जातात. लोककला क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरविण्याचा हा उपक्रम आहे.
यापूर्वी वर्ष 2024-25 चा पहिला लोकसाहित्य संशोधन पुरस्कार गोव्यातील लोककला अभ्यासक व संशोधिका प्रा. पौर्णिमा राजेंद्र केरकर यांना देण्यात आला होता. त्यांनी गोवा व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी यांच्याशी निगडित अनेक लोककला व लोकगीतांचे संशोधन केले आहे. तसेच लोकगीत जतनाचा पुरस्कार कणकवली, वरवडे येथील श्रीमती मालती मेस्त्री यांना देण्यात आला होता. विविध विधींमध्ये गायिली जाणारी लोकगीते त्यांना मुखोद्गत असून त्या परिसरात यासाठी प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमात गोव्यातील कलाकारांनी लोकगीत व लोककलांचे सादरीकरण केले होते.
यावर्षीचा 2025-26 चा लोकसाहित्य अभ्यास व संशोधनाचा पुरस्कार कुडाळ, सिंधुदुर्ग येथील मोहन रणसिंग यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर’ या पुस्तकामधील ठाकर समाजाच्या लोककलेवरील संशोधनाच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली आहे. मोहन रणसिंग हे मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी असून 1977 पासून ते ठाकर लोककला व ठाकर बोलीवर संशोधन करत आहेत. भारतीय भाषा अभ्यासक गणेश देवी संपादित ‘भारतीय लोकभाषांचे सर्वेक्षण’ या ग्रंथामध्ये ठाकर बोलीवर त्यांनी केलेले लेखन महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी मुंबई सकाळ, नवशक्ती, सामना आदी वृत्तपत्रांसाठी पुस्तक परीक्षणेही लिहिली आहेत. कादंबरी, कविता, लोकगीते, आत्मचरित्र व समाज संशोधन अशा विविध अंगांनी त्यांनी मराठी साहित्यात लेखन केले असून ते समकालीन महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. ठाकर समाजातील लोककला लोप पावत असताना त्यांनी केलेले संशोधन अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. त्यांच्या या पुस्तकास महाराष्ट्र फाउंडेशन व गोरे बंधू ट्रस्टचे अनुदानही प्राप्त झाले आहे.
लोककला जतनासाठीचा पुरस्कार कुडाळ येथील शिवदास कुमार गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे. ते एम.ए., बी.एड., बी.पी.एड. शिक्षण घेतलेले असून नेरूर कलेश्वर विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते चित्रकथी, कळसूत्री व चामड्याच्या बाहुल्या तयार करण्यात तसेच या कलेच्या सादरीकरणात पारंगत आहेत. ठाकर आदिवासी पारंपरिक लोककलांचे जतन, संवर्धन व सादरीकरण ते सातत्याने करतात. होतकरू तरुणांना ते प्रशिक्षण देतात व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून लोककलेचा प्रसार करतात. पिंगुळी येथील ठाकरवाडी म्युझियम उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पारंपरिक लोककला पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबालाही लोककलेची परंपरा असून वडील गणपत सखाराम मसगे व बंधू कृष्णा मसगे हेही या क्षेत्रात कार्यरत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रामीण लोककलांचा समृद्ध वारसा लाभलेला जिल्हा असून या लोककला काळाच्या ओघात लोप पावत आहेत. या पार्श्वभूमीवर लोककला संशोधन व जतनासाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वत्सला प्रतिष्ठान दरवर्षी तज्ज्ञ निवड समितीच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कारार्थींची निवड करते.
या वर्षीच्या निवड समितीत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, साहित्यिक वीरधवल परब, रश्मी कशेळकर, प्रा. विजय ठाकर, चित्रकार नामानंद मोडक, साहित्यिका कल्पना मलये तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यकर्ते विनायक सापळे यांचा समावेश होता.
या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, शाल व सन्मानचिन्ह असे असून वत्सला प्रतिष्ठानच्या वर्धापन दिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष संगीता कुंभार व कार्यवाह मोहन कुंभार यांनी दिली.
