सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते उद्घाटन..
⚡कणकवली ता.२३-: उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमांतर्गत १४ वर्षे पूर्ण ते १५ वर्ष वयोगटातील मुलींसाठी लसीकरण शिबीर राबविण्यात येत असून, मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करून वेळेवर लसीकरण करण्याचा उद्देश आहे.
लसीकरणाबाबत समाजात काही गैरसमज पसरले असले तरी या लसीचा मानवी आरोग्यावर कोणताही घातक परिणाम होत नाही, असे स्पष्ट करत संबंधित वयोगटातील मुलींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती हर्षदा वाळके यांनी केले.
कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे-इंगवले, डॉ. नेहा बिडकर, डॉ. विशाल रेड्डी, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, सहाय्यक अधिसेविका एस. एस. तिवरेकर, अधिपरिचारिका नयना मुसळे, एस. एस. चोडणकर तसेच आरोग्य सहाय्यक जयदीप वावळीये आदी उपस्थित होते.
