ग्रामस्थांकडून अभियंत्यांसमोरच कामाची पोलखोल..
⚡मालवण ता.२२-:
वायंगणी गावामध्ये सुरू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सरपंच रुपेश पाटकर व ग्रामस्थांनी करतानाच सदर कामात वीज पेटी बसवण्यासाठी बसवलेले बॉक्स निखळून पडत असल्याचे वीज महावितरणच्या अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवत बोगस कामाची पोलखोल केली आहे. नित्कृष्ट काम केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी तसेच कामाची गुणवत्ता सुधारावी अशा मागण्या ग्रामस्थानी करत अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
वायंगणी येथे सुरु असलेले भूमिगत वीज वाहिनीचे काम ग्रामस्थानी वीज अभियंत्यांना प्रत्यक्षपणे दाखवत या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सदर कामामध्ये आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन केले जात नसून केबल टाकताना योग्य खोली राखली जात नाही. विद्युत वितरणासाठी बसवण्यात आलेले रस्त्यालागतचे बॉक्स योग्य काँक्रिट न घालता बसवल्याने निखळून पडत आहेत. तसेच खोदकामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे, असे यावेळी ग्रामस्थानी सांगितले.
या कामामध्ये निष्काळजीपणा दिसून येत असल्याने संबंधित कामाची तात्काळ पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून कामाची गुणवत्ता सुधारावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. यावेळी चंदू सावंत, रमाकांत नाईक, आनंद कांबळी, सत्यवान सावंत गणेश धुळे, सचिन पेडणेकर, रितेश लाड, शुभम त्रिंबककर, सुनील त्रिंबककर , राजू पेडणेकर, गौरव पेडणेकर, संजय धुळे, शामसुंदर नाईक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
