२० स्पर्धांचा धमाका:रॅपिडो सुपर सिक्स, प्रशिक्षण शिबिरे आणि पंच शिबिरांचा समावेश..
⚡मुंबई दि.२२-: महाराष्ट्रातील कॅरमपटूंना अक्षरशः पर्वणी ठरणारा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा २०२६-२०२७ चा वार्षिक कार्यक्रम जाहीर झाला असून यंदा तब्बल २० भव्य स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंच्या कौशल्याला नवी धार देण्यासाठी विविध स्तरांवरील स्पर्धांसोबतच प्रशिक्षण शिबीर आणि पंच शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मार्च २०२७ मध्ये ३२ खेळाडूंसाठी रॅपीडो सुपर सिक्स कॅरम स्पर्धा पंचतारांकित ठिकाणी होणार असून हा कॅरमविश्वासाठी मोठा आकर्षणबिंदू ठरणार आहे.
यावर्षी केवळ स्पर्धाच नाही, तर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीर आणि पंचांच्या गुणवत्तावृद्धीसाठी पंच शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच बालदिनानिमित्त लहान मुलांसाठी आणि महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष रॅपीडो सुपर सिक्स स्पर्धा घेऊन कॅरमचा प्रसार अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सन २०१३ पासून सातत्याने वार्षिक कार्यक्रम जाहीर करण्याची परंपरा असोसिएशनने कायम राखली आहे.
या हंगामात सर्व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सिसका कंपनीचे बुलेट शॉट कॅरम बोर्ड्स व सोंगट्यांचा वापर करण्यात येणार असून खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धांची गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता अधिक उंचावणार आहे.
२०२६-२०२७ चा भरगच्च संपूर्ण स्पर्धा आराखडा
१) ६ वी रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, विले पार्ले – एप्रिल २०२६ २) ६० वी सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा, वाशी, नवी मुंबई – एप्रिल २०२६ ३) ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, बोरिवली – मे २०२६ ४) पंच शिबीर, मुंबई – मे २०२६ ५) १० वी श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, नरसोबावाडी, कोल्हापूर – जून २०२६ ६) ६ वी द चेंबूर जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा – जुलै २०२६ ७) ३ री कै. विनायक निम्हण स्मृती स्पर्धा, पुणे – ऑगस्ट २०२६ ८) २ री जुहू विले पार्ले जिमखाना स्पर्धा – ऑगस्ट २०२६ ९) ४ थी एम. आय. जी. क्रिकेट क्लब स्पर्धा, वांद्रे – सप्टेंबर २०२६ १०) ६० वी जुनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा – ऑक्टोबर २०२६ ११) राज्य मानांकन स्पर्धा, रत्नागिरी – नोव्हेंबर २०२६ १२) बालदिन रॅपिडो सुपर सिक्स – १४ नोव्हेंबर २०२६ १३) ६० वी सब जुनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा – नोव्हेंबर २०२६ १४) ४ थी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी – डिसेंबर २०२६ १५) प्रशिक्षण शिबीर – डिसेंबर २०२६ १६) २ री इनर व्हील महिला स्पर्धा, बोरिवली – जानेवारी २०२७ १७) ४ थी घाटकोपर जॉली जिमखाना स्पर्धा – जानेवारी २०२७ १८) १८ वी शिवाजी पार्क जिमखाना स्पर्धा – फेब्रुवारी २०२७ १९) महिला दिन रॅपिडो सुपर सिक्स – ८ मार्च २०२७ २०) आमंत्रित रॅपिडो सुपर सिक्स (फाईव्ह स्टार व्हेन्यू) – मार्च २०२७ अशा स्पर्धा आणि इतर कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान या भव्य वार्षिक आराखड्यामुळे महाराष्ट्रातील कॅरम खेळाडूंना सातत्याने स्पर्धात्मक संधी मिळणार असून कॅरम खेळाची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. मानद सचिव अरुण केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम राज्यातील कॅरम चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
