मोहिनी मडगावकर यांचा पलटवार: बाबू कुडतरकारांनी वाद न करता महायुती म्हणून आमच्या सोबत एकत्र काम करावे..
⚡सावंतवाडी, ता. २०-:
“आम्ही कोणी काय आणलं, कोणी काय केलं यामध्ये पडणार नाही. सावंतवाडीकरांच्या हिताचे जे प्रकल्प आहेत ते आम्ही नक्की पूर्णत्वास नेणार,” असे ठाम मत पर्यटन व उद्यान सभापती मोहिनी मडगांवकर यांनी व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, भाजप हा काम करणाऱ्यांचा पक्ष असून सत्ताधारी म्हणून कोणत्याही वादात न पडता शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेले प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही सत्ताधारी म्हणून करणार आहोत. कुडतरकर यांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या की, “हे सर्व प्रकल्प आम्ही महायुतीच्या माध्यमातून, सर्वांना सोबत घेऊन राबवणार आहोत. सावंतवाडीचे आमदार दीपकभाई केसरकर यांचे सहकार्य घेऊनच काम होणार आहे, हे आम्ही पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनाठायी विरोध करण्यापेक्षा शहरात सुरू असलेल्या चांगल्या कामांकडे लक्ष द्यावे.”
सावंतवाडीच्या विकासावर भर देताना त्यांनी सांगितले की, “शहरातील युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळणे, तसेच पर्यटनाला चालना मिळणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सावंतवाडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत.”
