एकाचा मृत्यू ; एक गंभीर जखमी..
कणकवली : तालुक्यातील जाणवली बौद्धवाडी येथे मुंबई – गोवा महामार्गावर बुधवारी (ता. १८ मार्च) रात्री सुमारे ९.४५ वा. च्या सुमारास झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अर्जुन कोदुसिंग गौंड (वय ३३, सध्या रा. गोवळ ता. देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सींग गौंड (वय ३०, रा. ग्राम जमुनिया, जि. दमोह, मध्यप्रदेश) व रवि हिरा गौंड (वय २५, रा. दलपातपूर, जि. दमोह, मध्यप्रदेश) हे दोघे मोटारसायकल ( एमएच ०१ डी ९२८६ ) वरून कणकवलीहून नांदगावच्या दिशेने जात होते. जाणवली बौद्धवाडी येथील बौद्धविहाराजवळ पोहोचल्यावर चालक अनिल गौंड याने मोटारसायकल भरधाव वेगात, बेदरकारपणे चालवित असताना त्याचा ताबा सुटला. परिणामी मोटारसायकल रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर जोरात आदळली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी अनिल गौंड यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर गंभीर जखमी असलेल्या रवि गौंड याला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ओरोस येथे हलविण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात मोटारसायकलचा वेग जास्त असल्याने व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
