भाजप युवा नेते विशालजी परब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.वेदिका परब यांचा भव्य शोभायात्रेत सहभाग!..
⚡सावंतवाडी ता.१९-: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आज ‘सकल हिंदू समाज’ सावंतवाडी यांच्या वतीने शहरात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये भाजपचे युवानेते विशालजी परब आणि सौ. वेदिका परब यांनी प्रत्यक्ष पायी चालत सहभाग नोंदवत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला.
शोभायात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक राजवाडा येथून अत्यंत मंगलमय वातावरणात झाला. पारंपारिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी नागरिकांनी तिचे स्वागत केले.
शोभायात्रा नारायण मंदिर येथे पोहोचली असता, तेथे महिलांतर्फे चित्तथरारक ‘मर्दानी खेळांचे’ प्रदर्शन करण्यात आले. महिलांनी दाखवलेल्या या शौर्याच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर, ‘वसंत शिशूवाटीका विद्याभारती’च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामावर आधारित एक सुंदर गीत सादर केले. या लहान मुलांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
या प्रसंगी विशालजी परब व सौ. वेदिका परब यांच्या हस्ते श्रीराम गीत सादर करणाऱ्या चिमुकल्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. लहान मुलांमधील कलागुणांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या भव्य शोभायात्रेत हिंदू समाजातील अबालवृद्ध, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावंतवाडीतील या उपक्रमाने हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
