⚡कुडाळ ता.१९-: तालुक्यातील चेंदवण येथील स्वराज उत्पादक गट, प्रभागातील होतकरू महिलांसाठी प्रेरणादायी असून अध्यक्ष सौ रश्मी देवेंद्र नाईक यांच्या कार्याला सलाम आहे, असे गौरवोद्गार प्रभाग समन्वयक सौ. प्रिया धर्णे यांनी काढले. चेंदवण माऊली मंदीर जवळ स्वराज उत्पादक गट इमारतीच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमेद अंतर्गत चालू केलेल्या स्वराज उत्पादक गटाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.
यावेळी स्वराज उत्पादक गट अध्यक्ष सौ .रश्मी देवेंद्र नाईक, सौ .सानिका परब (उपाध्यक्ष), सौ .शुभश्री श्रृंगारे (सचिव), प्रभाग समन्वयक सौ. प्रिया धर्णे, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर-बांदेकर, शिक्षिका ज्योती पाटील, सुप्रिया चेंदवणकर, ग्रामसखी सानवी चेंदवणकर, रेवती तोरसकर, साक्षी नाईक आणि चेंदवण गावातील सर्व ग्रामसंघ पदाधिकारी,सदस्य व महिलावर्ग उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त चेंदवण गावातील होतकरू महिलांच्या सक्षमीकरणासाठी माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांच्या पुढाकारातून स्वराज उत्पादक गटाचा शुभारंभ कुडाळ नगराध्यक्ष सौ प्राजक्ता शिरवलकर-बांदेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी स्वराज उत्पादक गटाचे विविध उत्पादक वस्तू, साहित्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत डिजिटल अवेअरनेस व आर्थिक साक्षरता या विषयावर सचिव सौ.शुभश्री शृंगारे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी डिजिटल बँकिंग मध्ये होणारे धोके आणि महिलांचे होणारे नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली.
महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिध्द निवेदक बादल चौधरी यांनी अनोख्या शैलीत महिलांसाठीचा खेळ पैठणीचा कार्यक्रमात रंगत आणली. 200 ते 250 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. गवस मॅडम यांनी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
चेंदवणमध्ये स्वराज उत्पादक गटाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…
