सिंधुदुर्ग दि.१९: हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुढीपाडवा साजरा होत असतानाच वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे आनंदाची दुहेरी बातमी समोर आली. ‘१०८’ रुग्णवाहिकेतच एका महिलेची सुखरूप प्रसूती होत गोंडस कन्यारत्नाचा जन्म झाला. आज सकाळी ८:२२ वाजता ‘१०८’ नियंत्रण कक्षाला वायंगणी येथून आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. त्यावेळी वेंगुर्ला येथील रुग्णवाहिका गोवा-बाम्बोळी येथील ड्युटीवरून परतत होती. तात्काळ प्रतिसाद देत पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आणि अवघ्या ८ मिनिटांत, म्हणजेच ८:३० वाजता रुग्णापर्यंत पोहोचले.
दरम्यान, गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असून प्रसूती कळा तीव्र झाल्याने तिला रुग्णालयात हलवणे शक्य नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ईएमएसओ डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ आणि रुग्णवाहिका चालक साईसिद्धेश मेस्त्री यांनी रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली असून महिलेने २.४ किलो वजनाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर माता व बालकाला पुढील उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षित दाखल करण्यात आले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी वेळेवर मदत मिळाल्यामुळे आई आणि बाळ सुरक्षित आहेत. १०८ सेवेमधील डॉक्टर व चालकांचे आम्ही मनापासून आभार मानतो, अशी भावना व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिकेत झालेली ही ४४७ वी प्रसूती असून सणाच्या दिवशीही तत्पर सेवा देणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुढीपाडव्याच्या शुभदिनी वायंगणी गावात नव्या जीवाच्या आगमनाने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
