सिधुदुर्गनगरी ता १८ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत समाज कल्याण समिती १ पद ,महिला बालकल्यान समिती १ पद, विषय समिती सभापती २ पदे निश्चित करण्यात येणार आहेत. २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत . त्यानुसार २५ मार्च रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यन्त नामनिर्देशक पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता सभेचे कामकाज होणार आहे प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर एका पदासाठी अधिक अर्ज वैध ठरले तर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येणार आहे व त्यानंतर नूतन विषय समिती सभापती यांची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद सदस्य मधून ४ विषयसमिती सभापती निश्चित होणार आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद कुडाळ सावंतवाडी तालुक्याला संधी मिळाल्यामुळे अन्य चार विषय समिती सभापतीपदाची संधी अन्य तालुक्यात मिळण्याची दाट शक्यता आहे . त्यामुळे कोण- कोण सभापती होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
