चालकाला गंभीर दुखापत: काल रात्री 11 ची घटना..
⚡वैभववाडी ता.१७-: इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी झाला. या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या चालकास क्रेन च्या सहाय्याने वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढले. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास घडला. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
इथेनॉल ने भरलेला टँकर ( नं.
एमएच 09- एफएल 7165 ) चालक नकाप्पा डोईफोडे घेऊन वारणा येथून गोव्याला जात होता. गगनबावडा पोलीस पासून काही अंतरावर करूळ घाटात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर डोंगराकडील बाजूला गटारात पलटी झाला. या अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चालकाचा पाय स्टेरिंग खाली अडकला होता. चालकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी गगनबावडा व वैभववाडी पोलीस शर्तीचा प्रयत्न करत होते. क्रेन च्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले. टँकरमध्ये असलेल्या ज्वालाग्रही पदार्थामुळे दुर्घटना घडू नये याची खबरदारी म्हणून फायर ब्रिगेडची गाडी ही दाखल झाली होती. टँकर मधील इथेनॉल रस्त्यावर सांडले होते. याची माहिती करूळ चेक नाका येथील पोलिसांनी मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोजसोनवलकर, पोलीस हवालदार संदीप कांबळे, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस शिपाई संदीप राठोड आदी घटनास्थळी उपस्थित होते.
