सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे प्रत्युत्तर
⚡सावंतवाडी ता.१७-:
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडीत आलेल्या ॲड. असीम सरोदे यांनी सावंतवाडी बार असोसिएशन आणि जिल्ह्यातील वकील सभासदांवर केलेले आरोप पूर्णतः निराधार, खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी केली आहे.
सरोदे यांचा हा खटाटोप केवळ जिल्ह्यातील सर्वसंमतीच्या उमेदवाराला विरोध करण्यासाठी असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बालाजी रणशूर, जेष्ठ विधिज्ञ संदिप निंबाळकर, ॲड. श्यामराव सावंत, ॲड. अमोल कविटकर, ॲड. गोविंद बांदेकर, ॲड. संकेत नेवगी, ॲड. राहूल मडगांवकर, ॲड. स्वप्नील कोरगांवकर, ॲड. सुशील राजगे, ॲड. अंकुश ठाकूर, ॲड. सुमित सुकी, ॲड. प्रतिक्षा भिसे, ॲड. सिद्धी परब आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ॲड. किशोर वरक यांनी ॲड. असीम सरोदे आणि निवृत्त न्यायमूर्ती नलावडे यांचे ‘मतदारांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यासाठी सावंतवाडी बार असोसिएशनकडे तोंडी परवानगी मागितली होती. मात्र, बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाचा कोणताही निर्णय होण्यापूर्वीच ॲड. वरक यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्ध केली.
सरोदे यांनी यापूर्वी बार्शी आणि सांगली येथे अशाच व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यमान बार कौन्सिल सदस्यांवर तथ्यहीन टीका केली होती. त्यांचा मूळ हेतू प्रबोधन नसून निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करणे हा असल्याचे लक्षात आल्यावर, बार रूममध्ये अशा कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. २४ मार्च रोजी निवडणूक झाल्यानंतर हे व्याख्यान घेण्याची तयारी अध्यक्षांनी दर्शविली होती, मात्र तरीही सरोदे यांनी परवानगीशिवाय व्याख्यान घेण्याचा हट्ट धरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
