आरोस श्री गिरोबा मंदिर येथे ‘गुढीपाडवा, रामनवमी महोत्सव’…

19 पासून कीर्तन, अभंग स्पर्धांसह दशावतारी नाटकांची मेजवानी..

⚡सावंतवाडी ता.१७-:
श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ आरोसतर्फे गुढीपाडवा व रामनवमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत हे कार्यक्रम सादर होणार आहेत. 19 मार्च रोजी ते 27 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी 7 वा. तुळस येथील कीर्तनकार ह. भ. प. सुबोध मराठी यांचे सायंकाळी 7 वाजता कीर्तन होणार आहे.
19 रोजी रात्री 8 वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगरध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाट्न होईल. यावेळी मळेवाड, आरोंदा, न्हावेली, सातार्डा जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहतील.
या कार्यक्रमानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित लहान गटाची अभंग गायन स्पर्धा होणार आहे. शुक्रवार, दि. 20 रोजी रात्री 8 वा. मोठ्या गटाची अभंग गायन स्पर्धा होणार आहे. शनिवार दि. 21 रोजी रात्री 9.30 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा ‘लेक माझी तुळजाभवानी’ हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. रविवार दि. 22 रोजी रात्री 9.30 वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘नील माधव’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार दि. 23 रोजी दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘राहू केतू’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवार, दि. 24 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता ‘शिवमंगळागौरी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. गुरुवार दि. 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त रात्री 10 वाजता श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस यांचा ऐतिहासिक ‘तो मृत्युंजय एक’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. शुक्रवार, दि. 27 मार्च रोजी रात्री 10 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत ट्रिकसिनयुक्त ‘एक पदा अर्थात पृथ्वी कंकण’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम श्री देव गिरोबा मंच आरोस गिरोबावाडी येथे होणार आहेत.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page