देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत 71 प्रकरणे निकाली…

⚡देवगड ता.१५-:
उच्च न्यायालय- मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत एस. पचंडी यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा १२०२ पैकी एकूण ७१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ३० लाख २५ हजार ५८७ रूपयांची वसुली झाली.

देवगड तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिल, सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, बँकांचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील एकूण ३३१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील २४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २३ लाख ९३ हजार ५७८ रूपये वसुली झाली. महावितरणकडून ५२ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील २ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून एकूण १५ हजार ४९० रूपये वसुली झाली. तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसुलीची ४३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात १२ हजार ८०० रूपयांची वसुली झाली. तालुक्यातील ग्रामपंचायती व देवगड-जामसंडे नगर पंचायतीकडून घरपट्टी वसुलीची एकूण २४९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील ३९ प्रकरणे निकाल काढण्यात आली असून १ लाख ४५ हजार ३१९ रूपयांची वसुली झाली. बँकांकडून ५२७ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील तीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ४ लाख ५८ हजार ४०० रूपयांची वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून अॅड. संगीता कालेकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page