वागदेत भरधाव कारची रिक्षा टेम्पोला धडक; चालक जखमी…

⚡कणकवली ता.१५-: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने वागदे टेंबवाडी येथे अपघात घडला. हा अपघात रविवारी (१५ मार्च) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झाला.

भंगार व्यावसायिक कुमार सूर्यवंशी हे आपल्या ताब्यातील रिक्षा टेम्पो घेऊन कणकवलीहून कसालच्या दिशेने जात होते. त्यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या GA-03 Z-9608 क्रमांकाच्या प्रेसो कारने वागदे टेंबवाडी येथे त्यांच्या रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की रिक्षा टेम्पोच्या चालकासमोरील काच फुटली आणि कुमार सूर्यवंशी हे त्या फुटलेल्या काचेच्या जागेतून बाहेर फेकले जाऊन रस्त्यावर पडले. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात प्रेसो कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षा टेम्पोचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

You cannot copy content of this page