⚡मालवण ता.१२-:
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकातील निर्देशानुसार मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख आरेखक राजेंद्र हरी कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे- अध्यक्ष – राजेंद्र कदम, उपाध्यक्ष – उमेश कोदे, सचिव – डी. डी. जाधव (प्रभारी मुख्याध्यापक), कोषाध्यक्ष- पांडुरंग राणे, सदस्य- रोहन कदम, विशाल राणे, चंद्रशेखर कांबळी, मधुसूदन परुळेकर, सल्लागार- विद्याधर कदम, विजय नातू, राकेश कदम यांची निवड करण्यात आली.
ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघ निवडीनंतर नूतन कार्यकारिणीने ओझर विद्यामंदिरची विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी कार्यवाही करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व विविध क्षमतांच्या प्रगतीसाठी व्याख्याने व कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करणे आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून देणे इत्यादी उपक्रमांची तातडीने कार्यवाही करण्याचे ठरविले. या सभेसाठी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे विश्वस्त नंदकुमार राणे, माजी विद्यार्थी तथा शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, माजी विद्यार्थी रविराज जाधव, शिक्षक शिवराम सावंत उपस्थित होते.
या सभेप्रसंगी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये ओझर विद्यामंदिरची कांस्यपदक विजेती हर्षिका राकेश कदम तसेच यशस्वी विद्यार्थी स्मृती उदय परब व योगेश यशवंत आयकर यांचा अध्यक्ष राजेंद्र कदम, संस्था संचालक नंदकुमार राणे व शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी पांडुरंग राणे यांनी आभार मानले.
