आठ खलाशी ताब्यात, जप्त मासळीचा लिलाव सुरू..
देवगड / प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक राज्यातील एका ट्रॉलिंग नौकेला जप्त केले आहे. या कारवाईत नौकेवरील तांडेलसह आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मासळीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने दि. १० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास गिर्ये समोरील सागरी क्षेत्रात गस्त घालत असताना कर्नाटक राज्यातील ‘श्री. सानिध्या’ नावाची ट्रॉलिंग नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ट्रॉलिंग करताना आढळून आली. सागरी हद्दीत अंदाजे १७ ते १८ फॅदम (वावा) खोलीवर ट्रॉलिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. गस्ती पथक जवळ येताच नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क पथकाने वेगवान पाठलाग करत नौकेला ताब्यात घेतले.
ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत करण्यात आली. देवगड परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘श्री. सानिध्या’ असून तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-5692 आहे. नौकेचे मालक गणेश लोकू बंगेरा (रा. कोजारकुली, गरडीमजल, केलारलाबेट मलप्पी, कर्नाटक) असून या नौकेला केवळ कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रात मासेमारी करण्याचा परवाना आहे.
कारवाईदरम्यान नौकेवरील तांडेलसह एकूण आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून नौका देवगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली आहे. जप्त मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून लिलावातून मिळणारी रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात येणार असून सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक टुकरुल, खवले, फाटक, बांधकर आणि सावजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीविरोधात विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वीही अशा अनेक नौकांवर कारवाई करून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून “अशा कारवाया आमच्या सागरी हद्दीचे संरक्षण करतात आणि स्थानिक मच्छीमारांना न्याय देतात,” अशी प्रतिक्रिया देवगडमधील मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
